6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी / Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech in Marathi.

६ डिसेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. फक्त भारतातच नाही तर जगभरात डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी या दिवशी आदरांजली देतात. ज्यांनी आपल्याला समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखवला, त्या महामानवाला सलाम करण्याचा हा दिवस आहे.
आजच्या पोस्टमधे दिलेले महापरिनिर्वाण दिन मराठी स्पीच शाळा, महाविद्यालय, तसेच सार्वजनिक कार्यक्रम यासाठी अत्यंत उपयोगी आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील प्रत्येकजण या भाषणाचा उपयोग करून डॉ.बाबासाहेबांच्या महान कार्यांविषयी भावपूर्ण शब्दांत आदर व्यक्त करू शकतात. हा लेख Mahaparinirvan Din Speech in Marathi, Dr Babasaheb Ambedkar Speech for Students या सर्व आवश्यकतांना पूर्ण करणारा आहे.
महापरिनिर्वाण दिन 10 ओळींचे भाषण मराठी 2025 विद्यार्थ्यांसाठी छोटे भाषण.
1️⃣ सर्वांना माझा नमस्कार. आज ६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे.
2️⃣ त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला.
3️⃣ त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
4️⃣ त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते.
5️⃣ त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई आंबेडकर होते.
6️⃣ “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा अमूल्य संदेश त्यांनी समाजाला दिला.
7️⃣ त्यांनी दलित, सर्वसामान्य नागरिक व विशेषतः महिलांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला.
8️⃣ सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी महान कार्य केले.
9️⃣ जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच जाते.
🔟 अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले.
Mahaparinirvan Din Speech in Marathi for Students / विद्यार्थ्यांसाठी महापरिनिर्वाण दिन भाषण 2025.(सोपे भाषण )

नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, आदरणीय गुरुजन तसेच मान्यवर उपस्थित सज्जनहो. आज आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत त्या महामानवाच्या स्मरणार्थ, ज्यांनी भारताचा इतिहास बदलला न्याय, समता आणि स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या अद्वितीय कार्याची आणि विचारांची आठवण करून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा पवित्र दिवस आहे.
आज भावना दाटून येणं स्वाभाविक आहे… कारण ज्या महान व्यक्तीमुळे आपण आज स्वाभिमानाने उभे आहोत, ज्यांनी “मानवाला माणूस” होण्याचा अधिकार दिला,त्यांच्या आठवणीने डोळ्यातून ओघळलेला प्रत्येक अश्रू हा कृतज्ञतेचा अश्रू आहे.
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो…
आपल्या सर्वांना माझा नमस्कार!
आज आपण अशा एका महापुरुषांच्या स्मृतीदिनानिमित्त येथे जमलो आहोत, ज्यांनी केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला नवीन दिशा दिली. भारतीय संविधानाचे शिल्पकार, समतेच्या सूर्याची प्रभा, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन.
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब या जगातून गेले असले,
तरी त्यांचे विचार आजही आपल्या देशाला उज्ज्वल भविष्याची वाट दाखवत आहेत. ज्यांनी “माणसाला माणूस म्हणून” ओळख दिली, ज्यांच्या लढ्यामुळे आपल्याला शिक्षणाचा दरवाजा उघडला, स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास दिला, ते म्हणजे आपले डॉ.बाबासाहेब आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे एखाद्या सामान्य व्यक्तीचे जीवन नव्हते, तर परिवर्तनाची प्रचंड लाट होती. शतकानुशतकांपासून समाजावर पडलेला अस्पृश्यतेचा अंधार दूर करण्यासाठी त्यांनी जे युद्ध लढले, ते अतूट जिद्दीचे प्रतीक होते. शिक्षण हे बदल घडवणारा सर्वात प्रभावी शस्त्र आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा मंत्र आजही प्रत्येक तरुणाला यशाकडे नेणारा प्रकाशस्तंभ आहे.
महापरिनिर्वाण दिन हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा दिवस नसून त्यांच्या महान कार्यांची उजळणी करून नवी प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. समान हक्क, स्वातंत्र्य, न्याय आणि मानवी मूल्ये जपणारे भारतीय संविधान त्यांनी घडवले आणि म्हणूनच ते जगातील सर्वात व्यापक आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे हे संविधान म्हणजे त्यांनी देशाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे.
आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी जेव्हा आपण बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो, तेव्हा आपण एक ठाम निर्धार करूया. आपल्या समाजातून अन्याय, असमानता आणि अंधश्रद्धेचे सावट दूर करण्यासाठी शिक्षणाची ज्योत हातात घेऊन पुढे चालत राहूया. संविधानाने दिलेल्या मूल्यांची आपण राखण करू, जातधर्माच्या भिंती कोसळवून एकतेने, प्रेमाने आणि बंधुभावाने जगण्याचा संकल्प दृढ करूया.
बाबासाहेबांनी सतत सांगितलं होतं की मनुष्याचा महानपणा जन्मावर नाही, तर त्याच्या कर्मांवर अवलंबून असतो. म्हणूनच आपण आपल्या कृतीतून त्यांच्या आदर्शांना आकार देणं ही आपली जबाबदारी आहे. महापरिनिर्वाण दिन आपल्याला स्मरण करून देतो की समाजपरिवर्तनाची वाट अखंड आहे आणि त्या प्रवासाचा खरा दिशादर्शक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांचा स्वाभिमानाचा मार्ग आहे.
शेवटी डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एवढंच सांगू इच्छितो की त्यांची शारीरिक उपस्थिती जरी संपली असली, तरी त्यांचे विचार, त्यांची क्रांती आणि त्यांच्या समतेचे स्वप्न आजही आपल्यात जिवंत आहे आणि सदैव जिवंत राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने असंख्य पिढ्या स्वाभिमानाने उभ्या राहिल्या आणि पुढेही उभ्या राहतील.
जय भीम! जय भारत! ✊🇮🇳💙
महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी शाळेसाठी /Mahaparinirvan Din Speech in Marathi for School.
आदरणीय व्यासपीठावर विराजमान मान्यवर, वंदनीय गुरुजन तसेच माझे प्रिय मित्र-मैत्रीणींनो…
आपल्या सर्वांना नम्र प्रणाम!
आज आपण त्या तेजस्वी महामानवाच्या स्मरणार्थ येथे जमलो आहोत,ज्यांनी स्वतःच्या जखमांतून संपूर्ण समाजाला बळ दिलं, स्वतःच्या संघर्षातून लाखो लोकांना हक्क दिले आणि स्वतःच्या दुःखातून मानवतेला स्वाभिमान दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वाट काट्यांनी भरलेली होती…पण त्यांनी काट्यांमधूनच क्रांतीची मशाल पेटवली.त्यांना समाजाने दूर ठेवले, पण त्यांनी कुणालाच हक्कापासून दूर ठेवू दिलं नाही.
ते म्हणाले,
“शिक्षण, समता आणि न्याय हेच समाजाचे खरी पायाभरणी आहेत.”
त्यांनी दडपलेल्या आवाजाला शब्द दिले, अज्ञानात भटकणाऱ्या पिढ्यांना शिक्षणाची दिशा दिली आणि मानवी जीवनाला संविधानाचा आधार दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
समता म्हणजे श्वास, न्याय म्हणजे विश्वास!
आपल्या संविधानाचे प्रत्येक पान म्हणजे सामाजिक क्रांतीचा ध्वज आणि तो ध्वज आपण सदैव उंच ठेवायला हवा.
महापरिनिर्वाण दिन हा फक्त एका महान व्यक्तीची आठवण नाही,तर त्यांच्या विचारांना नव्याने जगण्याचा दिवस आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमर आहेत, कारण त्यांचे विचार आजही आपल्या मनात जिवंत आहेत आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
या अद्वितीय महामानवाला विनम्र अभिवादन करून मी माझे भाषण येथे संपवतो/संपवते.
जय भीम ✊💙
जय हिंद 🇮🇳
जय भारत 🇮🇳
शिक्षकांसाठी महापरिनिर्वाण दिन भाषण मराठीत / 6 december mahaparinirvan din speech in marathi for teachers.

“धर्मभेद नाही, जातिभेद नाही…
डॉ.बाबासाहेबांनी मानवतेचा खरा मंत्र आपल्या हातात ठेवला,
अंधकार हटवून ज्ञानाचा तेजस्वी सूर्य उगवला,
शिक्षणाचा हक्क दिला… स्वतःच्या हिमतीने उभं राहण्याची ताकद दिली.”
जगण्याचे नवे मूल्य दिल्याबद्दलत्या महान विभूतीला या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम! 🙏💙
प्रिय विद्यार्थ्यांनो,
आजचा दिवस फक्त डॉ. बाबासाहेबांना आठवण्याचा नाही…आजचा दिवस आहे त्यांच्या विचारांना पुन्हा जागवण्याचा!
समतेच्या मार्गावर पुन्हा पाऊल टाकण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा,आणि ज्ञानाच्या प्रकाशाने स्वतःचे जीवन उजळण्याचा आहे.
६ डिसेंबर हा इतिहासात नोंदलेला असा क्षण आहे, जेव्हा भारताने एक तेजस्वी सूर्य गमावला. त्यांचा देह नाहीसा झाला, परंतु त्यांच्या विचारांचे प्रकाशकिरणआजही प्रत्येक भारतीयाला दिशा दाखवत आहेत.
तो तेजस्वी सूर्य…डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
न्याय, स्वाभिमान आणि समतेचा संदेश देणाराभारताचा खरा मार्गदर्शक!
कल्पना करा विद्यार्थी मित्रांनो… शाळेमध्ये एक छोटं मूल आहे. त्याला इतरांपासून वेगळं बसवण्यात येतं, त्याला हाताने पाणी घेण्यास अधिकार नाहीये. त्याच्या मानवी अस्तित्वालाच नाकारलं जातं. एका थेंब पाण्यासाठी पण त्याला मिळतो अपमान, तिरस्कार आणि अन्याय आणि त्या अपमानाच्या जखमेतून त्याच्या मनात एक प्रश्न जागा होतो “मी कमी आहे का?” त्या प्रश्नातूनच उगवतो जिद्दीचा दीप, आणि त्याच जिद्दीमधून जन्म घेते एक विलक्षण व्यक्तिमत्त्व डॉ.भीमराव रामजी आंबेडकर.
लहानपणी मिळालेल्या दुखाला त्यांनी कधी कमीपणा मानलं नाही. त्या वेदनेलाच त्यांनी शक्ती बनवलं, प्रेरणा बनवलं, आयुष्याचं ध्येय बनवलं. समाजाने तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी स्वतःचं अंतरंग कधी मोडू दिलं नाही. इतिहास साक्षी आहे. प्रत्येक क्रांतीचा जन्म वेदनेतूनच होतो आणि त्या वेदनेतूनच उभा राहिला एक भीम, ज्याने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की ज्ञान आणि स्वाभिमान यांच्या बळावर अंधारावर विजय मिळतो.
शाळेपासून महाविद्यालयापर्यंतचा त्यांचा प्रवास हा फक्त शिक्षणाचा नव्हता, तर स्वतःला सक्षम बनवण्याचा आणि संपूर्ण समाजाला नवा आकार देण्याचा होता. घरी दिवा पेटवण्यासाठी तेल नव्हतं, तरी त्यांचं मन ज्ञानाच्या प्रकाशाने उजळलेलं होतं. पुस्तकं खरेदी करायला पैसा नव्हता, पण शिकण्याची भूक अपरिमित होती. दिवस-रात्र वाचन, अभ्यास, चिंतन आणि लेखन करून त्यांनी स्वतःचा विकास केला. कारण डॉ.बाबासाहेबांना ठाऊक होतं व्यक्ती घडली तर समाज घडतो! त्यांच्या जिद्दीसमोर परिस्थितीने हार मानली आणि आज संपूर्ण जग त्यांच्या विचारांपुढे नतमस्तक झालं.
ज्या मुलाला स्वतःच्या गावात पाण्याचाही हक्क नव्हता, तोच मुलगा जगातील सर्वोत्तम विद्यापीठातून पीएचडी प्राप्त करतो. कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांचे विचार इतके प्रभावी होते की प्राध्यापकसुद्धा म्हणत, “हा मुलगा केवळ विद्यार्थी नाही, हा तर विचारांची क्रांती आहे.” त्या क्रांतीने पुढे भारताचे भविष्य बदलून टाकले. शिक्षणासाठी लढले, समाजाशी सामना केला आणि अंधाराला मागे सारत ते स्वतः प्रकाश बनले. भेदभावाची प्रत्येक भिंत कोसळून पडली आणि त्या धैर्यामुळे भीमराव इतिहासातील मानवतेचा सर्वात मोठा योद्धा बनला.
विद्यार्थ्यांनो, आज आपण अभ्यास टाळतो, आळस करतो किंवा मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतो. पण एकदा डॉ.बाबासाहेबांचा विचार करा. ज्यांना शिक्षण घेण्यासाठी अपमान सहन करावा लागला, त्या अपमानातून संघर्षाची ठिणगी पेटली, आणि त्या संघर्षात आयुष्यभर झुंज द्यावी लागली. तरीही एक गोष्ट त्यांनी कधी सोडली नाही ते म्हणजे शिकणं! कठीण परिस्थिती असो किंवा समाजाचा विरोध, त्यांनी ज्ञानाची ज्योत कधी विझू दिली नाही. त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे शिक्षण आणि जिद्द. ते स्वतःशीच युद्ध लढले; वेदनांना शक्ती बनवलं. ते म्हणायचे, “आयुष्यात पुढे जायचं असेल तर कष्टांना सामोरं जा. अडचणींना तुमची ताकद बनवा.”
आणि तो दिवस आला… ज्या मुलाला लहानपणी भेदभावामुळे पाण्याचा हक्कही नाही, त्याच्या हातात संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याची जबाबदारी देण्यात आली. भारतीय संविधानाची निर्मिती ही फक्त एक सरकारी कामगिरी नव्हती; हा होता संघर्षाचा ऐतिहासिक विजय! प्रथांनी डावललेल्या व्यक्तीनेच न्यायाचा सर्वात मोठा वाहक बनण्याचा क्षण होता तो. जेव्हा बाबासाहेबांनी त्या पेनाला हात लावला, तेव्हा त्या शाईत शब्द नव्हते फक्त, तर शतकानुशतकांच्या यातना, अन्यायाविरुद्धच्या लढाया, आणि लाखो पिढ्यांची स्वप्ने वाहत होती. त्या पानांवर माणुसकीचा सुवास होता. जगाच्या इतिहासात इतकं शक्तिशाली, न्यायप्रिय, समतेच्या मूल्यांनी नटलेलं संविधान दुसरं नसेल. बाबासाहेबांच्या लेखणीतून न्यायाची ज्वाला पेटली, समतेचे शब्द प्रकाश बनून झळकले आणि त्या विचारांतून भारताच्या नव्या भविष्याचा जन्म झाला!
संविधानाच्या जन्मानंतर भारताचे रूप संपूर्ण बदलून गेले. पूर्वीच्या भारतात मानवतेला स्थान नव्हते, जातीपातीच्या भिंती प्रचंड होत्या आणि समानता स्वप्नातही नव्हती. पण डॉ.बाबासाहेबांनी त्या प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्याला न्यायाचा प्रकाश दिला. समाजातील दुर्बलांना आवाज देत त्यांच्या हक्कांसाठी ते उभे राहिले. महिलांना समान अधिकार, कामगारांना कायदेशीर संरक्षण आणि सर्वांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करून त्यांनी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकला. ते केवळ एक मोठे नेता नव्हते, ते स्वतःमध्ये एक क्रांती होते परिवर्तनाची क्रांती, स्वाभिमानाची क्रांती.
त्यांच्या संविधानातील प्रत्येक ओळ समानतेचा दिवा बनली आणि प्रत्येक शब्द न्यायाचे शक्तिशाली कवच ठरला. त्या पानांतून एक नवा भारत उभा राहिला. जिथे मानवी मूल्यांना सर्वोच्च स्थान मिळालं. आजचा इतिहास त्या परिवर्तनाचा जिवंत साक्षीदार आहे आणि पुढील हजारो वर्षे बाबासाहेबांच्या विचारांचं तेज असंच उजळत राहील.
विद्यार्थ्यांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे फक्त कागदाची पानं नाहीत, तर ते आपल्या भविष्याचं दार उघडणारं सामर्थ्य आहे. आपल्या स्वप्नांना जगण्याचा अधिकार देणारं कवच आहे आणि स्वाभिमानाची खरी ओळख आहे. तेवढ्यावर ते कधीच थांबले नाहीत. समाज बदलण्यासाठी, लोकांच्या मनात सत्याची ज्योत पेटवण्यासाठी त्यांनी हजारो भाषणे केली, असंख्य आंदोलनं उभारली. जेथे न्याय मिळण्यास नकार दिला जात होता, तिथे डॉ.बाबासाहेब स्वतः पुढे येऊन न्याय मिळवून देत. त्यांच्या आवाजात केवळ शब्द नव्हते, तर गडगडाट होता, जो झोपलेल्या समाजाला जागं करायचा, भीतीचे किल्ले कोसळवायचा आणि लोकांच्या आयुष्याला नवी दिशा द्यायचा. तो आवाज आजही कुठेच थांबलेला नाही, कारण त्याचा प्रतिध्वनी आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीत जिवंत आहे.
होय विद्यार्थ्यांनो, प्रत्येकात एक छोटासा डॉ. भीमराव आंबेडकर दडलेला आहे, तो कधी तुमच्या मेहनतीत दिसतो, कधी तुमच्या स्वप्नांमध्ये, कधी तुमच्या जिद्दीत. खरा प्रश्न इतकाच त्या भीमाला तुम्ही जागं ठेवता की झोपू देता? शिका, कारण शिक्षण तुमचा सन्मान वाढवतो. मेहनत करा, कारण मेहनतच तुमचं सामर्थ्य आहे. नीतिमत्तेने जगा, कारण तिथेच खरा स्वाभिमान वसतो. आणि अन्याय पाहिला तर शांत न बसता त्याविरुद्ध आवाज उठा, कारण हेच डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले असे नाही, ते आजही आपल्या श्वासात जगतात, संविधानाच्या प्रत्येक कलमात दिसतात, न्यायालयातील प्रत्येक निर्णयामध्ये जाणवतात आणि अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक क्रांतीच्या आवाजात घुमतात. जोपर्यंत भारतात अन्यायाविरुद्ध आवाज उठत राहील, तोवर डॉ.बाबासाहेबांचे विचार अमर राहतील आणि त्यांचे युग अखंड तेजाने उजळत राहील.
6 डिसेंबर 1956 ला त्यांचे पार्थिव शरीर नष्ट झाले, पण त्या दिवशी मावळलेला सूर्य फक्त आकाशातून गेला, त्याचा प्रकाश मावळला नाही. संपूर्ण राष्ट्र थबकलं, ढग रडले, आकाशही शोकात बुडालं, कारण भारताने आपला मार्गदर्शक सूर्य गमावला होता. परंतु विद्यार्थ्यांनो, सूर्य कधीच कायमचा मावळत नाही; त्याची किरणं पुढच्या पिढ्यांना प्रकाश देत राहतात. बाबासाहेबांचं शरीर नष्ट झालं असेल, परंतु त्यांचे विचार, त्यांची क्रांती, त्यांची शिकवण आजही प्रत्येक विद्यार्थ्यात, प्रत्येक पुस्तकात, प्रत्येक मनात आणि प्रत्येक संघर्षात जिवंत आहे.
म्हणूनच महापरिनिर्वाण दिन हा दु:खाचा दिवस नाही; तो आहे विचारांना नव्याने जागवण्याचा दिवस, मानवतेची मशाल पुढे नेण्याचा दिवस, आणि डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार करण्याचा दिवस.
हीच डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे की त्यांनी दिलेले विचार आपण कृतीत उतरवावेत आणि समाजात समानतेचा प्रकाश सतत जिवंत ठेवावा. आपल्या हक्कांसाठी दिलेली त्यांची लढाई आज आपण आपल्या कर्तव्यानं पुढे न्यायची आहे.
प्रिय विद्यार्थ्यांनो, आज या सभेतून बाहेर जाताना एक गोष्ट मनात घट्ट कोरून ठेवा जर तुमच्या मनात डॉ.बाबासाहेबांचे विचार आहेत, तर तुम्हाला थांबवू शकेल अशी शक्ती या जगात नाही. स्वप्नं मोठी ठेवा, कारण ती पूर्ण करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. उंच भरारी घ्या, कारण पंख तुमचेच आहेत. डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा, कारण भविष्यातला शक्तिशाली भारत तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या हातात घडतो आहे.
जय भीम! जय भारत! ✊🇮🇳✨
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुंदर मराठी भाषण / Mhaprinirvan din bhashan in marathi 2025.
“ज्यांनी अन्यायासमोर कधी डोके झुकू दिलं नाही.
अडथळ्यांनी कितीही थांबवले तरी त्याची वाट वाकडी झाली नाही.
शिक्षणाच्या ध्येयापासून ते एक पाऊलही मागे हटले नाही.
भीमरावांचा इतिहास म्हणजे धगधगत्या जिद्दीची ज्योत.”
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे एका साध्या घरात भीमराव यांचा जन्म झाला. वडील रामजी सैन्यात होते त्यामुळे शिस्तबद्ध होते आणि आई भीमा अत्यंत प्रेमळ व कष्टाळू होत्या. लहानवयातच त्यांनी समाजातील असमानता आणि भेदभावाची कडू वास्तवता जवळून अनुभवली. शाळेत पाण्याच्या घागरीला त्यांना हात लावू दिला जात नसे, पाणी मागितलं तर वरून ओतलं जायचं. बाकावर बसण्यास मनाई, वर्गात वेगळी जागा… वेगळे नियम. पण या अपमानाने त्यांना खचवले नाही. उलट त्यांच्या मनात ठाम निश्चय रुजला “मी शिकणार, मोठं होणार आणि या अन्यायाला उत्तर देणार!”
समाजाने केलेल्या भेदभाव यांनी त्यांना एकच शिकवलं की शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि ज्ञाना शिवाय स्वातंत्र्य नाही. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. तिथे त्यांनी अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला आणि पीएचडीची पदवी मिळवली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डीएससी मिळवली आणि त्याचबरोबर कायद्याचे शिक्षण घेतलं. एका भारतीय तरुणाने त्या काळी मिळवलेला या पदव्या म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या कर्तृत्वांपैकी एक आहे. ज्या व्यक्तीला भारतात पाण्याचा घोट मिळत नव्हता. तोच पुढे जगातील सर्वात विद्वान लोकांमध्ये उभारलेला त्यांच्या जिद्दीचा, परिश्रमाचा आणि दृढ निश्चयाचा पुरावा आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी समाज uplift करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू केले. अस्पृश्यतेचा विषारी डंख संपवण्यासाठी त्यांनी निर्भयपणे आवाज उठवला. महाडच्या चवदार तळ्यावरील पाणी हक्क आंदोलन हे त्यांच्या धैर्याचे सर्वात भक्कम उदाहरण आजही इतिहासाने जतन केले आहे. त्यांनी लोकांना दाखवून दिलं की पाणी हा अधिकार आहे, दयेची याचना नाही. डॉ.बाबासाहेबांनी मानवतेलाच धर्म मानलं आणि अस्पृश्यतेच्या प्रथेला स्पष्ट शब्दांत पाप ठरवलं. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून त्यांनी शिक्षण, राहणीमान, रोजगार आणि सामाजिक हक्क यासाठी शोषित समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे दडपलेल्या समाजाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळाली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर एका बलशाली लोकशाही राष्ट्राला न्याय, समता आणि स्वातंत्र्य देईल असं संविधान बनवणं अत्यावश्यक होतं. हे कार्य पार पाडण्यासाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल अशी एकच व्यक्ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर! संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन जगातील सर्वात व्यापक आणि मानवी मूल्यांनी भरलेलं संविधान त्यांनी घडवलं. प्रत्येक भारतीयाला समान अधिकार, समान संधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, शिक्षणाचा हक्क आणि स्त्री-पुरुष समानता मिळवून देण्यामागे त्यांची दूरदृष्टी होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या संविधानामुळे आज प्रत्येक भारतीय स्वाभिमानाने जगू शकतो.
त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, “मला असा भारत घडवायचा आहे जिथे कोणीही कोणावर पाय ठेवून पुढे जाणार नाही, तर एकमेकांना हात देत सोबत पुढे वाढत राहील”.समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी समानतेचा लढा लढला, पण महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. विवाहात समान हक्क, मुलांवर ताबा, संपत्तीवरील अधिकार आणि सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य हे सर्व हक्क महिलांना कायद्याने मिळवून देण्यामागे मोठी शक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेबच. त्यांनी स्त्री-पुरुष समानतेला केवळ वाक्यांमध्ये मर्यादित ठेवले नाही, तर ते संविधानात पक्केपणे कोरले. म्हणूनच त्यांना भारतातील वास्तविक स्त्री सक्षमीकरणाचे जनक मानले जाते.
त्यांनी समाजाला शिकवलं की स्वाभिमान माणसाप्रमाणे बदलत नाही; प्रत्येक व्यक्ती समान अधिकारांसाठी पात्र आहे. समाजातील धार्मिक असमानता आणि भेदभाव पाहून त्यांनी संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा समता आणि विज्ञानावर आधारित बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमध्ये लाखो अनुयायांसह त्यांनी बुद्धांचा मार्ग स्वीकारला. त्यावेळी त्यांनी सांगितलं “बुद्धांचा मार्ग म्हणजे विज्ञान, तर्क आणि समानतेचा मार्ग आहे”. त्यांनी लोकांच्या मनात मानवतेची ज्योत प्रज्वलित केली. संदेश दिला मानवतेला सर्वात वर ठेवा, द्वेषाऐवजी करुणा स्वीकारा आणि अंधश्रद्धेपेक्षा विचारांची ताकद महत्त्वाची समजा.
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांची जीवनयात्रा संपली, पण त्यांचे विचार कधीच थांबले नाहीत.ते आजही आपल्या संविधानात, आपल्या अधिकारांमध्ये, आपल्या प्रगतीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारांमध्ये जिवंत आहेत.ते आपल्यासाठी फक्त एक नेता नव्हते; तर ते मार्गदर्शक दीप होते. ज्यांनी रस्ता दाखवला, स्वाभिमान दिला आणि उभं राहण्याची हिंमत शिकवली.
विद्यार्थ्यांनो, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला सर्वात मोठी शिकवण देऊन गेले आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.कारण शिक्षण हेच खरं सामर्थ्य आहे जे भविष्य घडवतं. संघटित राहिलात तर लढ्याचं बळ वाढतं, आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर अन्याय कुठेही डोकं वर काढू शकत नाही.अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हीच खरी देशभक्ती आणि डॉ.बाबासाहेबांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे.
त्यांनी नेहमी सांगितले की आयुष्यात समस्या कितीही मोठ्या असल्या तरी धैर्य सोडू नका.परिस्थिती वाईट आली म्हणून हार मानली तर स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत.डॉ.बाबासाहेबांनी एकदाही संकटांसमोर हार मानली नाही आणि म्हणूनच आज संपूर्ण जग त्यांना सामाजिक न्यायाचे महान योद्धा, संविधानाचे मूर्तिकार आणि मानवतेचे खरे रक्षणकर्ते म्हणून आदर देते. आपण आज शाळेत शिकतो, मोकळेपणाने बोलतो, आपल्या अधिकारांबद्दल जागरूक आहोत हे सर्व त्यांच्या संविधानामुळेच शक्य झाले आहे. त्यांच्या तत्वांचा स्वीकार केल्यास आपण चांगले नागरिक बनू शकतो आणि आपल्या समाजासाठी चांगली कामे करू शकतो.
आणि आता या प्रेरणादायी प्रवासाच्या शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की डॉ.बाबासाहेबांचे जीवन म्हणजे दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. अंधार कितीही गहिरा असला तरी हा दीपस्तंभ न्यायाचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग उजळत ठेवतो. आपण हा मार्ग प्रामाणिकपणे चाललो तर हीच त्यांना मिळालेली खरी श्रद्धांजली ठरेल. एवढे बोलून मी माझे शब्द इथेच संपवतो.
Final Words :-
बालमित्रांनो, डॉ. बाबासाहेबांचे विचार हे फक्त इतिहास नसून आपल्या प्रत्येक पावलाचा मार्गदर्शक आहेत. समता, शिक्षण आणि न्याय यांचा दिवा सदैव पेटता ठेवणं हीच आपल्या सर्वांची खरी जबाबदारी आहे.
आजच्या पोस्टमधील भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भाषण आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही प्रेरणा पोहोचवा. शाळा, महाविद्यालय किंवा कोणत्याही कार्यक्रमात हे भाषण नक्की वापरा.
डॉ.बाबासाहेबांचा विचार पुढे न्यायला आपण सर्वजण एकत्र येऊया! जय भीम ✊💙 जय भारत 🇮🇳